खानापूर / प्रतिनिधी  

खानापूर तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या हत्तींनी आता जंगलातून थेट मानवी वस्तीकडे कूच केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर हातातोंडाशी आलेल्या पिकांचेही हत्ती नुकसान करत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

दरम्यान जांबोटी भागात दोन टस्करांनी ठाण मांडले आहे. ओलमणी पासून मोदेकोप पट्ट्यात तसेच कबनाळी भागात दोन हत्तींचा संचार कायम सुरू आहे.गेल्या दोन दिवसांपासून अबनाळी भागात असलेल्या दोन हत्तींनी केळी तसेच ऊस पिकांचे नुकसान केले आहे. येथील शेतकरी बाबू गवळी यांच्या संपूर्ण केळी पिकाचे या हत्तींनी प्रचंड नुकसान केले आहे.

या दोन टस्करांचा हैदोस वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेकांनी मळण्या सुरू केल्या आहेत. तरी वाळलेले गवत व जनावरांसाठी केलेला चारा हत्ती फस्त करत आहेत. त्यामुळे गुरे पाळण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

तेव्हा वनविभागाने हत्तीप्रवण क्षेत्रात सौरकुंपण किंवा मोठ्या चरी खणून वन्य प्राण्यांपासून पिक व मानवी वस्तीचे संरक्षण करावे अशी मागणी मागणी करूनही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने, ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.