• ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या दोन आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  दीपक सुदेश पवार (वय २२) आणि राहुल गंगाधर जाधव (वय २१)  दोघेही (रा. करत मनस्कुल झोपडपट्टी, पो.कुंभार पिंपळगाव, ता. गुणसंगी, जि.जालना महाराष्ट्र राज्य) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. 

याबाबत आज पत्रकारांना माहिती देताना जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी यासह ग्रामीण भागातील चोऱ्या आणि घरफोडीच्या तपासासाठी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख एम. वेणुगोपाल आणि पोलिस उपअधीक्षक आर. बी. बसरगी आणि रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली. बैलहोंगल पोलिस निरीक्षक व्ही. बी. सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले होते. या पथकाने अत्याधुनिक तपास साधनांचा वापर करून दोन आरोपींना महाराष्ट्र राज्यातून अटक केल्याचे त्यांनी सांगितले. 

आमच्या तपास पथकाला जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. जे आरोपी सापडले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकानात चोरलेल्या दागिन्यांची विक्री केली आहे. आमची टीम अजूनही एका मुख्य आरोपीचा शोध घेत आहे. बैलहोंगल येथे ५, नेसरगी येथे ३ गुन्हे, हुक्केरी येथे १, संकेश्वरमध्ये १ गुन्हे दाखल आहेत. आमच्या विभागाने एक टीम तयार केली आहे. बिट कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त घालून रात्रीच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी मोठी काळजी घेतली आहे. 

याप्रकरणी आरोपींची कसून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी, हुक्केरी आणि संकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील आणखी एक सहआरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. 

साखळी चोरीच्या घटना सध्या थांबल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील १० प्रकरणांचे रहस्य उकलण्यात यश मिळवलेल्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो असे एसपी गुळेद यांनी सांगितले. बैलहोंगल सीपीआय पी. व्ही. सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली, या प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल नेसरगी पीएसआय मल्लिकार्जुन बिरादार, बैलहोंगल पीएसआय गुरुराज कलबुर्गी आणि पोलीस कर्मचारी विठ्ठल दोड्डोनप्पनवर, शंकर मेनसीनकाई, व्हीएस यरगट्टीमठ, यूए पुजेरी, चेतन बड्डी, जेआर मळगली, एके डोंबारा, मुत्तू मुरगोड, एस. एम अंगडी, आणि बेळगाव तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कनवर आणि सचिन पाटील यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.