•  बेळगावात आंबेडकर क्रांती युवा वेदिकेची निदर्शने

बेळगाव  / प्रतिनिधी 

कलबुर्गी जिल्ह्यातील कोतनूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आणि ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आंदोलन करण्यात आले. कलबुर्गी जिल्ह्यातील कोतनूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत आंबेडकर क्रांती युवा वेदिकेच्या वतीने आज चन्नम्मा चौकात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी बोलताना आंबेडकर क्रांती युवा वेदिकेचे पदाधिकारी महेश गाडीवड्डर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समानता दिली आहे. अशा महान नेत्याच्या कलबुर्गी येथील पुतळ्याची काही विकृत समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली हे निषेधार्ह आहे. तेव्हा आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांना राज्यातून हद्दपार करावे. भविष्यात अशी कृत्ये होऊ नयेत यासाठी सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी आंबेडकर क्रांती युवा वेदिकेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.