- हत्येमागचे कारण पोलिस तपासात आले समोर
पणजी : पोटच्या चार वर्षांच्या मुलाचा ताबा पित्याकडे जाईल, या भीतीपोटी वैफल्यग्रस्त होऊन मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या ‘ब्रिलियंट’ महिला सूचना सेठ या संशयित महिलेला म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोव्यात कालपासून आईनेच चार वर्षीय मुलाची हत्या केल्याचे प्रकरण गाजत आहे. जन्मदात्री आई अशाप्रकारे निष्पाप मुलाचा जीव का बरे घेईल, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे. यावर पोलिसांनी प्राथमिक तपास केला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा ताबा त्याच्या वडिलांकडे जाईल, या भीतीने ही महिला वैफल्यग्रस्त बनली होती. याच अवस्थेतून तिने त्याची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयित सूचना सेठ ही मूळ पश्चिम बंगालची असून बेंगळुरूमध्ये राहते. तिचा पती केरळचा असून सध्या जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे. २०१० साली दोघांचे लग्न झाले होते. २०१९ साली मुलाचा जन्म झाला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये बिनसले. त्यांच्यात वाद सुरू झाले. २०२० साली परिस्थिती हाताबाहेर गेल्याने दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. पुढे सूचना सूचनाने आपले सगळे लक्ष आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअपकडे वळवले. २०२१ साली तिला ‘१०० ब्रीलियंट वूमन इन एआय एथीक्स लिस्ट २०२१'च्या सन्मानाने भूषविण्यात आले आहे. खाजगी आयुष्यात आलेल्या अपयशाशी लढत तिने आपले व्यावसायिक करीअर उच्च शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरूच होती. पण मुलाची कस्टडी कोणाकडे असावी, हा प्रश्न होताच. यावर तात्पुरता तोडगा म्हणून न्यायालयाने दर रविवारी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यात यावा अशी अट ठेवण्यात आली होती.
मुलाचा ताबा आपल्याकडून जाणार. तो पित्याकडे जाणार, या भीतीने कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिने मुलासकट ताडकन गोवा गाठला होता. रविवार, ७ जानेवारी रोजी मुलाशी भेट झाली नाही या कारणास्तव तिच्या पतीने फोन केला असता त्यांच्यात वाद झाला. शेवटी मुलाच्या चिंतेने वैफल्यग्रस्त होत तिने टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
0 Comments