• समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना 
  • जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचार प्रतिबंध व जनजागृती समितीची बैठक

बेळगाव / प्रतिनिधी 

विकास कामांकरिता ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करा असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. आज शुक्रवार दि. ०५ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हा हिंसाचार प्रतिबंध व जनजागृती समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, शासनाने अनुदान दिल्यास अनुसूचित जाती व प्रवर्गातील लोकांच्या जिल्ह्य़ातील ४० स्मशानभूमीत पिण्याचे पाणी, तारांचे कुंपण, तात्पुरते शेड बांधणे व इतर कामे करता येतील,असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या विविध योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कर्ज व सुविधा देण्याबाबत बँकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी दलित संघटनांचे नेते मल्लेश चौगले यांनी बैठकीत केली.याबाबत बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून योग्य तो आढावा घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील स्पष्ट केले. 

अँट्रॉसिटीच्या प्रकरणांची कसून तपासणी न करताच काही पोलिस अधिकारी बी अहवाल दाखल करून पीडितांवर अन्याय करत आहेत. त्यामुळे अँट्रॉसिटी प्रकरणांमध्ये बी अहवाल सादर करताना त्याची नियमित आणि संवेदनशील पद्धतीने तपासणी व्हायला हवी, असा आग्रह दलित नेते मल्लेश  चौगुले यांनी धरला. त्याचप्रमाणे त्यांनी नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती / वर्गातील लोकांवर  अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यापासून २४ तासांच्या आत पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तांत्रिक कारणांमुळे हे शक्य नसेल तर कोणत्याही कारणास्तव केस ४८ तासांपेक्षा जास्त नसावी. दुसऱ्या हप्त्याची मदत आरोपपत्र दाखल केल्यानंतरही तात्काळ दिलासा सुटकेसाठी कारवाई करावी, असे ते म्हणाले.

अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात अनुसूचित जातीचे बहुतांशी नागरिक राहत असून पंचायत राज अभियांत्रिकी विभागाने एससीपी-टीएसपी अनुदानातून तातडीने रस्तेबांधणीचे काम हाती घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.  या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद,नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस अधिक्षक रवींद्र गडादी, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा नियोजन कक्ष विभागाचे संचालक मल्लिकार्जुन, सामाजिक विभागाचे संचालक मल्लिकार्जुन जोशी, संचालक लक्ष्मण बबली, अन्न विभागाच्या सहसंचालक श्रीशैला कंकणवाडी तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी व जिल्हा दक्षता समितीचे सदस्य करेप्पा गुडेन्नावर, विजया बसप्पा तलवार, जीवन मांजेकर आदि उपस्थित होते.