•  स्मोक कँडल जाळल्या

नवी दिल्ली :
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना, सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे  समोर आले आहे. कारण प्रेक्षत गॅलरीतबसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेतहा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे कलर स्प्रे असल्याची माहिती मिळाली आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आले. या प्रकारानंतर लोकसभेचे  कामकाज थांबवण्यात आले  आहे, अशी माहिती एका खासदाराने दिली. तसेच, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला खासदार मनोज कोटक यांनी पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. 

लोकसभेत नेमके काय घडले?
संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे लोकसभेचे कामकाज सुरु होते. प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहात होते. अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. या गर्दीत तीन जण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली जिथे सर्व खासदार बसून कामकाज करत असतात, तिथे उडी मारली. त्यांच्याकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती. 

लक्ष वेधण्यासाठी स्मोक कँडल :
दरम्यान, ज्या व्यक्तीने  गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचे  नाव सागर असल्याचे समजते. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले. 

संसदेबाहेर दोघांचे आंदोलन, महाराष्ट्रातील तरुण ताब्यात :
संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या. तसेच, दोघांनीही घोषणाबाजीही केली. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे. २५ वर्षांचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर लोकसभेबाहेर गोंधळ घालणारी ४२ वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.