- परिवहन बसची दुचाकीला पाठीमागून धडक
- अपघातात पंधरा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू
- विजयपूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील घटना
विजयपूर / वार्ताहर
विजयपूरहून मुंबईकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस क्र. (MH -13, CU-6338) ची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात १५ वर्षाची बालिका जागीच ठार झाली तर तिचे वडील किरकोळ जखमी झाले.सविता पुजारी (वय १५) असे मृत बालिकेचे नाव आहे. विजयपूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील अरकेरी गावानजीक आज सकाळी १० वा. सुमारास ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, (वडरट्टी ता. अथणी जि. बेळगाव) येथील वडील आणि मुलगी अमावस्येनिमित्त अरकेरी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस विजयपूर मुंबईकडे निघाली असता चालकाचा ताबा सुटल्याने, बसची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच तिकोटा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पाहणी करून पंचनामा केला. तसेच बस चालकाला ताब्यात घेतले. यानंतर उत्तरीय तपासणी करून बालिकेचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात घेण्यात आला. या घटनेची नोंद तिकोटा पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments