- वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई, १३ डिसेंबर २०२३ :
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयातून घरी आणले होते, मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. रवींद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटात एकत्र अभिनय केला होता. वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान १९९५ मध्ये रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचार केलयानंतर २०११ मध्ये रवींद्र बेर्डे यांना कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
0 Comments