बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन विभाग, ग्रामीण व लघु उद्योग विभाग, कृषी विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ, जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव ह्यूम पार्क येथे आयोजित ६४ व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प प्रदर्शन व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री  सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते करण्यात आले. 

प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, यावर्षी ६४ व्या जिल्हास्तरीय फळ व पुष्प व औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात आयोजित केलेले  हे  प्रदर्शन खूप आकर्षक असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा नीटनेटकेपणाने आयोजन केल्याने शेतकरी आणि जनतेसाठी अतिशय सोयीचे होणार आहे. फळे,भाज्या यांचे प्रकार आणि त्यांचे संगोपन कसे करावे याची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहे.भाज्यांसाठी खाजगी शीतगृहे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी उद्यानविभागाचे अधिकारी शिवानंद यांनी आज बेळगाव शहरात ६४ वे जिल्हास्तरीय फळ - पुष्प औद्योगिक उत्पादन प्रदर्शन सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने उद्यान विभाग, औद्योगिक विभाग, कृषी संस्था, कृषी विभाग, रेशीम विभाग, मधुमक्षिका पालन विभाग आदि  सर्व विभागांचे अधिकारी एकत्र आले आहेत. तेव्हा येत्या तीन दिवसात फळ-पुष्प प्रेमींनी बेळगावातील या प्रदर्शनाला भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.  

प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी प्रादेशिक आयुक्त संजय बी. शेट्टण्णावर, पोलिस महानिरीक्षक विकास कुमार, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ.भीमाशंकर एस.गुळेद, पोलिस आयुक्त एस. सिद्धरामप्पा, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख , सोमशेखर हुल्लोली, महांतेश मुरगोड, शरणबसप्पा दर्शनपुर, एस. एस. मल्लिकार्जुन शिवनगौडा पाटील यांच्यासह कर्नाटक शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन विभाग, ग्रामीण व लघु उद्योग विभाग, कृषी विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ, जिल्हा कृषी सोसायटीचे अधिकारी, जनता व शेतकरी उपस्थित होते.