•  जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती

 बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा प्रशासनाने जेएन १ म्युटंट या कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

बेळगाव बीम्स संस्थेच्या सभागृहात गुरुवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कोरोनाबाबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, जिल्हाधिकारी नितेश पाटील पुढे म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी  रुग्णालयात ९०८ कोविड ऑक्सिजन बेड, ७८ व्हेंटिलेटर सर्व काही कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांनाही  गतकाळातील कोरोना व्यवस्थापनाचा अनुभव आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर तपासणी बाबत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. कोविड किट उपलब्ध करून देण्याबाबत सरकारला आधीच पत्र लिहिले आहे. ते लवकर येईल असे ते म्हणाले.

यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले, गतकाळात कोरोनामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राथमिक बैठक घेण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. सीमेवर अधिक सतर्कता बाळगण्यात, आणखी कोविड तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात तसेच शहरात खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. बिम्स मधील डॉक्टरांची कमतरता यापूर्वी सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. सरकार लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वेळी रुग्णांची संख्या वाढली होती, आमच्याकडे खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी औषधे नव्हती, सीमेवर खबरदारी कशी घ्यावी यावर आम्ही चर्चा केली, औषधांचा साठा आहे. कोविड टेस्टिंग किट, बेडची व्यवस्था पूर्णपणे तयार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, डीएचओ महेश कोणी, बीम्स संचालक अशोक शेट्टी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.