चिक्कोडी : निपाणी तालुक्याच्या मांगूर गावातील एक सैनिक आणि त्याच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हुपरी कागल मार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली. लष्करी जवान प्रकाश सूर्यवंशी (वय २८) आणि त्याचा मित्र ओंकार जठार (वय २०) हे दोघे दुचाकी वरून कागल शहरातून मांगुर गावाकडे येत असताना ही दुर्घटना घडली. अपघाताची बातमी समजतात कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. 

जवान प्रकाश हा बंगळूर येथे पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होता आणि २५ नोव्हेंबर रोजी रजेवर आला होता. घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव येथील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.