- शिनोळीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे रास्तारोको आंदोलन
- चंदगड तहसिलदारांनी घेतली आंदोलकांची भेट
- मध्यवर्ती म. ए. समितीचे तहसिलदारांना निवेदन
- महाराष्ट्र सरकारने सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे
- मराठी भाषिकांची निवेदनाद्वारे मागणी
चंदगड / प्रतिनिधी
कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला बेळगाव जिल्हा प्रशासनाने शहरात १४४ कलम जारी करून कायदा व सुव्यवस्थेचे तकलादू कारण देत यावर्षीही परवानगी नाकारली. त्यामुळे आज सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र राज्यातील बेळगाव सीमेलगत शिनोळी येथे रास्तारोको आंदोलन करून केंद्र सरकारसह कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध केला. महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर काल रविवारी तातडीची बैठक घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला होता,त्यानुसार हे आंदोलन छेडण्यात आले.कोल्हापूर जिल्हा शिवसेना (ठाकरे गटाने) या आंदोलनात सहभाग घेतला. यानिमित्ताने आज महाराष्ट्राच्या हद्दीत सीमा भागातील मराठी भाषिकांचा बुलंद आवाज घुमला.
तत्पूर्वी हिंडलगाव हुतात्मा स्मारक येथे एकत्र येत म. ए. समिती, शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. बेळगाव, खानापूर, निपाणी आदि सीमाभागातील समिती - शिवसेना नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्म्यांना अभिवादन करून समिती व शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शिनोळीकडे मार्गस्थ झाले.
शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील माजी आमदार दिगंबर पाटील आदींच्या नेतृत्वाखाली कर्नाटकाच्या हद्दीतून त्यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला. यावेळी हातात भगवे झेंडे व फलक घेतलेल्या समिती - शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह तमाम मराठी भाषिकांनी रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में, बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाचं पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान घोषणा देतच कर्नाटकच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना कर्नाटक पोलिसांनी समिती - शिवसेना नेते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली.
त्यानंतर समिती व शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या हद्दीतील रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
- सीमासमन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांनी राजीनामा द्यावा : शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे
यावेळी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना (ठाकरे गट) कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना सीमाभागात लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी देत नाही. महाराष्ट्र सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांची अवस्था "आई जेवू घालेना अन् बाप भीक मागू देईना" अशी झाली आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले पाहिजे. निदान कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तरी येथे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायला हवे होते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांना महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून येथे पाठवायला हवे होते, पण सीमावासियांच्या लढ्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ते उपस्थित राहिले नाहीत, त्यांनी सीमावासियांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मंत्री शंभूराजे देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विजय देवणे यांनी केली. तसेच शिनोळी येथे सीमावासियांचा भव्य महामेळावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने परवानगी द्यावी त्याला सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
- महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नात हस्तक्षेप करून सीमावासियांना दिलासा द्यावा : माजी आमदार मनोहर किणेकर
याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले, त्यासाठी सीमालढ्यात बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांपैकी पहिले पाच हुतात्मे हे बेळगावचे आहेत याची आठवण करून देत, महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नात हस्तक्षेप करून सीमावासियांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
- मराठी भाषिकांचे आंदोलन दडपले जात असताना महाराष्ट्र सरकार गप्प का? : माजी आमदार दिगंबर पाटील
कर्नाटक सरकार बेळगावत अधिवेशन घेत आहे तो वादग्रस्त सीमाभाग असल्याने तिथे अधिवेशन घेऊ नका असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खडसावून सांगायला हवे होते. समिती आणि मराठी भाषिकांचे आंदोलन दडपण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावत जमाबंदी लागू करते तरीही महाराष्ट्र सरकार गप्प का? या शब्दात माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान माजी महापौर सरिता पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे कर्नाटक सरकारची सीमावासियांवर दडपशाही वाढत असल्याचे सांगून महाराष्ट्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. तर तालुका म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत म. ए. समिती आंदोलन करत आहे. ते दडपण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न महाराष्ट्राने खपवून घेऊ नये अशी मागणी केली.
दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच चंदगड तहसीलदारांनी आंदोलनस्थळी दाखल होत, आंदोलकांची भेट घेतली. त्यांना मनोहर किणेकर यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे लिहिलेले निवेदन वाचून दाखवले. कर्नाटक सरकार म. ए. समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांना अटक करून लोकशाही मार्गाने करण्यात येत असलेल्या आंदोलन दडपून अन्याय करत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी निवेदनात केली आहे. चंदगड तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार तथा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, राजाभाऊ पाटील प्रकाश मरगाळे, शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते रामचंद्र मोदगेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मदन बामणे, अमर येळळूरकर, आर. एम. चौगुले एम. जी. पाटील, विकास कलघटगी, रणजीत चव्हाण - पाटील, सुरेश अगसगेकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते व मराठी भाषिक सहभागी झाले होते.
- बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर वाहतूक ठप्प :
दरम्यान म. ए. समितीने अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी शिनोळी येथे छेडलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे बेळगाव - वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी आणि वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे रास्तारोको आंदोलनामुळे प्रवासी तसेच नागरिकांची गैरसोय झाली.
- आंदोलनकर्त्यांच्या सौजन्यशीलतेचे कौतुक :
आंदोलनांमध्ये अनेकवेळा हिंसक घटना झालेल्या पाहायला मिळतात. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन हे नेहमीच शांतता आणि सनदशीर मार्गाने केले जाते. याचाच प्रत्यय आज शिनोळी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रास्तारोको आंदोलनावेळी आला. आंदोलना दरम्यान महाराष्ट्रातून बेळगावच्या दिशेने निघालेली एक रुग्णवाहिका शिनोळी फाटा येथे आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला बेळगावच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी वाट मोकळी करून दिली. वास्तविक आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आंदोलनासाठी रुग्णवाहिकेला वेठीस न करता मार्ग मोकळा करून दिल्याने मराठी भाषिक आंदोलनकर्त्यांनी दाखवलेल्या सौजन्यशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- महाराष्ट्र - कर्नाटक सीमेला पोलीस छावणीचे स्वरूप : सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला यावर्षीही जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे बेळगाव नजीकच्या चंदगड तालुक्याच्या हद्दीतील शिनोळी येथे महाराष्ट्र सीमेवर महाराष्ट्र एकीकरण समितीने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी हातात फलक, भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेल्या महाराष्ट्र एकीकरण तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह तमाम मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत महाराष्ट्रातून कर्नाटक हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यासर्व प्रकारामुळे सीमेवर तणाव वाढल्याने दोन्ही राज्यातील पोलिसांनी खबरदारी म्हणून सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. परिणामी महाराष्ट्र - कर्नाटक सीमेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
- म. ए. समिती कार्यकर्त्यांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल :
बेळगावात सीमाबांधवांना मेळावा घेण्यास कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने शिनोळी येथे महाराष्ट्र सरकारच्या हद्दीत येऊन रास्तारोको आंदोलन करणाऱ्या म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध चंदगड पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय आंदोलकांनी सकाळी ११ ते दुपारी सव्वा दोनपर्यंत रास्तारोको आंदोलन करून बेळगाव वेंगुर्ला रस्ता बेकायदेशीररीत्या बंद केला. त्यामुळे शिवसेना नेते विजय देवणे, रा. कोल्हापूर यांच्यासह प्रभाकर खांडेकर रा. शिनोळी खुर्द (ता. चंदगड) , विक्रम मुतकेकर रा. विनायकनगर चंदगड, दिनकर पावआर.एम. चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, रमाकांत कोंडुसकर, श्रीपाद अष्टेकर, शुभम शेळके, लक्ष्मण मनवाडकर, दिगंबर पाटील, नेताजी जाधव , गोपाळ देसाई, ,मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, सरिता पाटील, निखील देसाई , प्रकाश अष्टेकर, मुरलीधर पाटील, मनोहर किणेकर आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
0 Comments