- पोलीस आयुक्त एस. सिद्धरामप्पा यांची माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी ५ हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. सिद्धरामप्पा यांनी दिली आहे. हे अधिवेशन दि. ४ ते १५ डिसेंबर दरम्यान बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणार असून त्यासाठी बेळगाव पोलीस सज्ज झाले आहेत.
अधिवेशन काळात राज्यातील विविध जिल्ह्यातून बेळगाव येथे बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या पोलिसांच्या निवासासाठी सुवर्ण विधानसौध अलारवाडजवळ दोन कोटी रुपये खर्चून ४ जर्मन तंबू वापरून टाऊनशिप बांधण्यात आली आहे. म्हैसूरचे के. एम. शरीफ यांनी १३ दिवसात शंभर कामगारांच्या मदतीने या मंडपाची उभारणी पूर्ण केली आहे.
या टाऊनशिप मध्ये चार मोठे जर्मन तंबू आणि एक छोटा तंबू बांधण्यात आला आहे. एक जर्मन तंबू १०० फूट रुंद आणि २०० फूट लांब अशा पद्धतीने एकूण चार जर्मन तंबू आहेत. अधिकाऱ्यांसाठी छोटा मंडपही बांधण्यात आला होता. प्रत्येक टाऊनशिप मध्ये पाचशे कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.
हलग्या नजीक उभारलेला तंबू वॉटरप्रूफ असून येथे एकूण २००० पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी खाट, उषा आणि चादर देण्यात आली आहे. त्याशिवाय मोबाईल चार्जिंग सिस्टीम देखील उपलब्ध केली आहे. हलग्याव्यतिरिक्त सांबरा, कंग्राळी खुर्द येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र व अन्य काही ठिकाणी उर्वरित पोलिसांच्या निवासाची व्यवस्था केल्याचे पोलीस आयुक्त एस. सिद्धरामप्पा यांनी सांगितले.
0 Comments