• बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांची प्रसारमाध्यमांना माहिती   

बेळगाव / प्रतिनिधी 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेसवर दगडफेक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. परशुराम नायक आणि बसवराज शिंदे दोघेही (रा.बेनकनहोली,ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस चौकशीत सदर दोन आरोपींनी दारूच्या नशेत हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. अटक करण्यात आलेले दोघे आरोपी गोव्यात प्लास्टरचे काम करतात.

बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर बेनकनहोळी गावानजीक गुरुवारी रात्री हुक्केरी ते बेळगाव नॉन-स्टॉप बसवर सदर हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. त्यामुळे बसच्या डाव्या बाजूची काच फुटून कामट्याट्टी गावातील प्रवाशी रमेश चिवटे हे जखमी झाले होते. जखमी रमेश चिवटे यांच्यावर यमकनमर्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

दुसरीकडे मुंबईहून हुबळीला जाणाऱ्या महाराष्ट्र परिवहनच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. या दरम्यान हायवे पेट्रोलिंग (महामार्ग गस्तीवरील) पोलिसांनी तसेच  जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.