- बसवण बागेवाडी तालुक्यातील हुविन हिप्परगीनजीक घटना
विजयपूर / वार्ताहर
रस्त्यानजीक थांबलेल्या ट्रॅक्टरला रुग्णवाहिकेची पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात, रुग्णवाहिकेतील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तर डॉक्टर आणि नर्स हे किरकोळ जखमी झाले. विजयपूर जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी तालुक्यातील हुवीन हिप्परगीनजीक आज शनिवारी दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भाग्यश्री पायण्णावर (रा. ताळीकोटी) असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार,भाग्यश्री हिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबिय तिला रुग्णवाहिका क्रमांक (KA - 28, G512) तून उपचारासाठी विजयपूरला घेऊन निघाले असता. बसवणबागेवाडी तालुक्यातील हुविनहिप्परगी नजीक रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यानजीक उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला रुग्णवाहिकेची पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.
दरम्यान अपघाताची माहिती समजताच बसवण बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद बसवण बागेवाडी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments