खानापूर / प्रतिनिधी
बेळगाव शहरासह जिल्हाभर आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा खानापूर फटका तालुक्यालाही बसला आहे. या पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरी निमित्त बेळगावला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी व नोकरदार वर्गाने आज घरीच राहण्याचे पसंद केले.
खानापूर तालुक्यात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असून, सर्वत्र भात कापणीला जोर आला आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भात पीक कापून ठेवले होते. परंतु कापून ठवलेले भातपीक आज झालेल्या पावसात सापडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. करंबळ येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी भात पीक कापून ठेवले होते. पावसामुळे शेतात पाणी साचून भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यावर्षी पाऊस नसल्याने भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने हातातोंडाशी आलेले, थोडे कमी प्रमाणात मिळणारे भात पीक सुद्धा वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सरकारने उशिरा का होईना खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अजून दुष्काळ निधी जमा करण्यात आला नाही. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ निधी जमा करावा तसेच पावसात भिजलेल्या भात पिकाची पाहणी करून त्याचीही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
0 Comments