अहमदाबाद दि. १९ ऑक्टोबर २०२३ :
भारताने दिलेल्या २४१ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्याच षटकात १५ धावा वसूल करत इरादे स्पष्ट केले होते. पण मोहम्मद शामीने दुसऱ्याच षटकात डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शही फार काळ तग धरु शकला नाही. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श याचा अडथळा दूर केला. मिचेल मार्शने १५ चेंडूत १५ धावा केल्या. त्याने या छोटेखानी खेळीत एक चौकार आणि एक षटाकर ठोकला. स्टिव्ह स्मिथ याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. स्मिथ फक्त चार धावांवर बाद झाला. स्मिथचा अडथळा बुमराहने दूर केला. ४७ धावांवर ३ विकेट गेल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण ट्रेविस हेड आणि लाबुशेन यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. लाबुशेन याने एक बाजू लावून धरली तर दुसऱ्या बाजूला ट्रेविस हेड याने फटकेबाजी केली. हेड याने अवघ्या ९५ चेंडूत शतक ठोकले. त्यानंतर त्याने आणखी आक्रमक रुप धारण केले. ट्रेविस हेड याच्या शतकानंतर लाबुशेन यानेही अर्धशतक ठोकले. लाबुशेन आणि ट्रेविस हेड यांची जोडी फोडण्यात भारताच्या भेदक माऱ्यांना यश आले नाही. या दोघांनी १९२ धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ट्रेविस हेडचे शतक : ट्रेविस हेड यांने झंझावती शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. ट्रेविस हेड याने १२० चेंडूत १३७ धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने ४ षटकार आणि १५ चौकार मारले.
लाबुशेनचे अर्धशतक : ४७ धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर लाबुशेन याने संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. लाबुशेन याने ११० चेंडूमध्ये नाबाद ५८ धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकारांचा समावेश होता.
भारताची गोलंदाजी :
ट्रेविस हेड आणि लाबुशेन या जोडीपुढे भारताचे गोलंदाज फिके दिसत होते. त्यांनी भारताला सामन्यात कोणताही संधी दिली नाही. शामी आणि बुमराह यांनी चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि लाबुशेन या जोडीपुढे एकाही भारतीय गोलंदाजाची डाळ शिजली नाही. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा ही फिरकी जोडीही विकेट घेण्यात अपयशी ठरली. जाडेजाने १० षटकात ४३ तर कुलदीप यादव याने १० षटकात ५६ धावा दिल्या. बुमराहने दोन विकेट घेतल्या. तर शामी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी नाणेफेक गमाविल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आक्रमक अंदाजामुळे टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्माने धुंवाधार सुरूवात केली मात्र, शुभमन गिलने (Shubman Gill) चूक केली अन् हातात कॅच देऊन बसला. रोहित आणि विराटने (Virat Kohli) डाव सावला पण रोहित मॅक्सवेलला सिक्स मारण्याच्या नादात बाद झाला. सर्वांना अपेक्षा असलेला श्रेयस अय्यर कमाल दाखवू शकला नाही.भारताने पहिल्या ११ षटकांत ८१ धावा करत दमदार सुरुवात केली होती पण ३ विकेट्स पडल्या होत्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांना केवळ दोनच चौकार लगावता आले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अचूक नियोजनासह शानदार गोलंदाजी केली.विराट कोहली बाद झाल्यावर टीम इंडियाच्या आशा मावळल्या. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स जात राहिल्याने अखेर टीम इंडियाला ५० षटकांत सर्वबाद २४० धावा करता आल्या.
भारतातर्फे केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या पण त्याला टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवता आले नाही. विराट कोहलीने ५४ तर कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. ज्यांच्याकडून फिनिशिंगची अपेक्षा होती, त्या रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना महत्त्वाच्या सामन्यात खेळता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.
0 Comments