मुंबई दि. १५ नोव्हेंबर २०२३ : विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार पहिल्या चार षटकांत भारताने बिनबाद ३८ धावा केल्या आहेत. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय नाणेफेक जिंकल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारत आणि  न्यूझीलंड संघात कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. 

विश्वचषकाच्या साखळी फेरीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार विकेट्सनी विजय मिळविला होता. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडने २०१९ सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे  त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. भारताने  विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात  नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उभय संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत. 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडची प्लेईंग 11 - 

डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, केन विलियमसन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिचेल सेंटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.