- खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
- सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ बहरली
बेळगाव / प्रतिनिधी
भारतात हिंदू धर्मातील सणांमध्ये गणपती आणि नवरात्रोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण म्हणून दिवाळी हा सण ओळखला जातो. दिवाळी म्हटले की खरेदी ही आलीच.
यंदाचा दिवाळी सण केवळ चार-पाच दिवसांवर आल्याने दिवाळीच्या साहित्याने बेळगाव बाजारपेठ बहरली आहे. दिवाळीची चाहूल देणारे आकाशकंदील, प्रकाशाचा झगमगट करणारे दिवे, विविध डिझाईन मध्ये रंगीबेरंगी पणत्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
त्याचबरोबर मेणबत्ती ,रांगोळी, मातीचे दिवे, सुगंधी उटणे, साबण, अत्तर, पूजेचे साहित्य, लायटिंगच्या माळा सजावटीच्या विविध साहित्याने दुकाने सजली असून खरेदीला वेग आला आहे.
इलेट्रॉनिक वस्तू, कपडे, यासह इतर साहित्यदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. प्रामुख्याने गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळगल्ली यासह शहरातील विविध ठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
- आकर्षक आकाशकंदील खरेदीला प्राधान्य :
'दिवाळी' म्हटले की घरादाराला प्रकाशित करणारा आकाश कंदील हा आलाच. आज बाजारपेठेत पारंपारिक आकाश कंदीलासोबत काही आकर्षक आकाश कंदील देखील आपल्याला पहावयास मिळत आहेत.
कापडी आकाश कंदीलांचा नमुना प्रामुख्याने गोलाकार असून त्यामध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- तामिळनाडू येथील पणत्यांसह सिरॅमिक पणत्यांची क्रेझ :
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण सर्वत्र भरभराटीचा प्रकाश पसरविणारा हा मोठा सण. आज बाजारात विविध आकारांमध्ये आकर्षक अशा आखीव रेखीव पणत्या उपलब्ध असून पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर तामिळनाडू येथील पणत्या आणि सिरॅमिकच्या पणत्या दाखल झाल्या आहेत.
या आकर्षक पणत्यांना अधिक पसंती दिली जात आहे. मातीच्या पणत्या २० ते ३० रुपये डझन, तामिळनाडूच्या पणत्या ५० ते १०० रू. डझन असा दर आहे. लहान मोठ्या आकारात सर्व प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- विविध रंगातील रांगोळीची मोठ्या प्रमाणात विक्री :
सप्तरंगांची सुरेख उधळण म्हणजे रांगोळी. अंगणात सुरेख रेखाटलेली रांगोळी घराचे सौंदर्य अधिकच खुलवते. त्यातही दिवाळीच्या वातावरणात दारोदारी रांगोळ्या काढल्या जातात.
दिवाळी ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती, रांगोळी, इको फ्रेंडली रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्यांकरता बाजारात विविध रंग उपलब्ध आहेत.
- रेडिमेड फराळाचा पर्याय :
फराळा शिवाय दिवाळी ही कल्पनाच करता येत नाही. त्यामुळे बाजारात रेडीमेड फराळ आपल्याला पाहायला मिळतो. फराळ तयार करण्यास वेळ नसलेल्यांसाठी रेडिमेड फराळाचा हा पर्याय उपलब्ध झाला आहे. फराळाचे सर्व पदार्थ बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- दिवाळीच्या किल्ल्यांसाठी प्रतिकृतींना मागणी :
लहान मुलांचा आणि थोरामोठ्यांचा आगळावेगळा उपक्रम म्हणजे दिवाळीत किल्ले बनवणे. परंतु आजकाल किल्ले पारंपारिक पद्धतीने बनवण्यापेक्षा तयार केलेले किल्ले बाजारात मिळत असल्याने तेच घरी आणले जातात. यानिमित्ताने किल्ले आणि मावळ्यांच्या प्रतिकृती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
विविध मंदिरे, शिवरायांच्या प्रतिकृती, मावळे, बुरुज आदींची विविध ठिकाणी विक्री होऊ लागली आहे.पारंपरिक पद्धतीने आकर्षक गड किल्ले उभारले जात आहेत. त्यामुळे बाजारात शिवरायांच्या विविध प्रतिकृतींना मागणी वाढू लागली आहे.
आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, किल्ले, फराळ म्हटले की दिवाळी अगदी थाटामाटात साजरी केली जाते. मात्र यंदा ऐन नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तरीही दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. एकंदरीत दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
0 Comments