- गेल्या तीन दिवसांपूर्वी गणपतीपुळे समुद्रकिनारी आला होता वाहून
- जीवंत असल्याने बचाव मोहीम राबवून दिले होते जीवदान
- एमटीडीसी कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हा प्रशासनाने केले होते प्रयत्न
रत्नागिरी / प्रतिनिधी
गेले तीन दिवस गणपतीपुळे समुद्रकिनारी वाहून आलेल्या व्हेलचा मृत्यू झाला असून गुरुवारी सकाळी व्हेलचे शव गणपतीपुळे जवळच्या मालगुंड समुद्रकिनारी आणण्यात आले असून गोवा येथून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने त्याचे शवविच्छेदन केले. तसेच त्याच्या मृत्यूचे कारण लवकरच कळेल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गणपतीपुळे येथील एमटीडीसीसमोरील किनाऱ्यावर ब्लू व्हेल आढळून आला होता. तो जीवंत असल्यामुळे एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हा प्रशासनाचे विविध विभागही त्यासाठी प्रयत्नशील होते. वनविभागासह भारतीय तटरक्षक दल, तसेच पुणे येथील विशेष पथक यासाठी तेथे दाखल झाले होते. दरम्यान, आजारी असल्यास किंवा कळपापासून दुरावल्यास व्हेल, डॉल्फिन, पॉरपॉईज यांसारखे सस्तन प्राणी किनाऱ्यावर वाहून येतात. याच शक्यतेतून हा व्हेल गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर वाहून आल्याचा अंदाज आहे. दरम्यान, समुद्रकिनारी आढळलेल्या व्हेलसाठी बचाव मोहीम राबविण्यात आली. वनविभागाने या मोहीमेसाठी पुण्यातील ‘रेस्क्यू’ संस्थेचे पथक, भारतीय तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विभाग आणि जेएसडब्लूच्या बोटीची मदत घेतली होती. हे बचावकार्य रत्नागिरी वनविभाग, रेस्क्यू – पुणे, एमटीडीसी, जेएसडब्लू, कोस्ट गार्ड, रत्नागिरी पोलीस, मत्स्यव्यवसाय विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि गणपतीपुळ्याचे स्थानिक यांनी पूर्ण केले. प्रशासन व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून समुद्रात सोडलेल्या व्हेलचा अखेर मालगुंड किनाऱ्यावर मृत्यू झाला.
- व्हिसेरा तपासणी करणार -
व्हेलचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर विनविभागाने यासाठी पशुवैद्यकीय विभागाची मदत घेतली. गोव्यातून विशेष डॉक्टरांचे पथक गणपतीपुळे मालगुंड किनारी दाखल झाले होते. शवविच्छेदन गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाले असून पुढील तपासणीसाठी त्याचा व्हिसेरा पाठवण्यात आला आहे.
0 Comments