पणजी दि. २८ नोव्हेंबर २०२३ :
हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्यात आयोजित ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मंगळवारी समारोप पार पडला. यावेळी डग्लस यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा उपस्थित होते.
इफ्फीच्या समारोपासाठी मायकल डग्लस यांची पत्नी नामवंत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या कॅथरिन झिटा जोन्स, त्यांचा मुलगा अभिनेता डायलन डग्लस हे देखील उपस्थित होते.
प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा आपला मोठा सन्मान आहे. सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली आणि चारुलता सारख्या चित्रपटांचा चित्रपट प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास केला होता, असे डग्लस म्हणाले.
मायकल डग्लस यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात दोन अकादमी पुरस्कार, पाच गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक एमी पुरस्कार यांचा यात समावेश आहे. डग्लस यांना या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
गोव्याच्या आदरातिथ्याने भारावले मायकल डग्लस !
ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते आणि दोन वेळा ऑस्कर विजेते असलेले मायकल डग्लस गोव्याच्या आदरतिथ्याने चांगलेच भारावले आहेत. मंगळवारी इफ्फीच्या ‘मास्टर क्लास’ सत्रात त्यांनी गोव्याचे तोंड भरून कौतुक केले. येथील मैत्रीभाव, उत्साह पाहून मी, माझी बायको कॅथरीन आणि मुलगा खूप भारावून गेलो. आम्ही इथे खूप आनंदात आमचा वेळ व्यतीत करत आहोत, असे डग्लस यांनी म्हटले आहे.
गेले ३६ तास माझ्यासाठी खूप छान होते. मी १७ वर्षांनी पुन्हा भारतात आलो आहे. न्यूयॉर्क आणि गोव्यात साडे दहा तासांचे अंतर आहे. मात्र, गोव्यात आल्यावर आम्हाला चांगले वाटले. मी गेल्या नऊ महिन्यांपासून रिटायरमेंट आयुष्याचा आनंद घेत आहे . मी आता घरकाम करत असतो. कदाचित पुढील तीन वर्षे मी या ठिकाणी रिटायर्ड आयुष्याचा आनंद घेईल. तसेही गोवा देखील चांगले वाटत आहे.
विविध देशांनी एकत्र येत जागतिक समस्या सोडवणे, हे पुढील पिढीला जमू शकेल. पृथ्वीसारख्या सुंदर आणि छोट्या ग्रहावर आपण केलेली घाण त्यांना साफ करावी लागणार आहे. मला माहिती आहे की, त्यांच्या पुढे वेगळ्या समस्या असतील. ते त्या सोडवतील, अशी माझी आशा असल्याचे डग्लस यांनी सांगितले.
‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है’
अमिताभ बच्चन यांचा ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है’ हा डायलॉग डग्लस यांनी बोलून दाखवला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्सही केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात याला प्रतिसाद दिला.
अभिनयापेक्षा निर्मात्याची भूमिका आवडते
अभिनय केला आहे. तसेच निर्माता म्हणून देखील काम केले आहे. मला स्वतःला सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवायला आवडते. त्यामुळे साहजिकच अभिनयापेक्षा मला निर्मात्याची भूमिका जास्त आवडते, असे डग्लस यांनी म्हटले आहे.
0 Comments