खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मात्र ही आग रात्री किती वाजता लागली याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आज सकाळी मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांना कॅनरा बँकेच्या शाखेत आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी लागलीच अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यास   सुरुवात केली. आतमध्ये धुराचे लोट पसरल्याने अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी जयराम हमन्नवर, बसवराज तेगुर, अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

या आगीत बँकेचे संपूर्ण फर्निचर कागदपत्रे संगणक व इतर वस्तू जळून खाक झाल्याची शक्यता आहे.  ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये पैसे ठेवले होते त्याला आग लागली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज पूर्णपणे विझल्यानंतर नुकसानीचे नेमके प्रमाण स्पष्ट होणार आहे.