बेळगाव / प्रतिनिधी 

कलमेश्वर गल्ली बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील बेपत्ता झालेले गिल्बर्ट डायस (वय ५३) यांचा मृतदेह आज सकाळी गावातील मारिया भवन नर्सरी स्कूलच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतात उघड्या विहिरीत आढळून आला. गिल्बर्ट मंगळवार दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ ते २ यावेळेत घरातून बेपत्ता झाले होते.  याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध व चौकशी करून न सापडल्याने जॅकी डायस यांनी गिल्बर्ट यांचा शोध घेण्यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कलकडे मदत मागितली. 

फेसबुक फ्रेंड सर्कलने काल बुधवार दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी बेळगुंदी भागातील विविध शेतात, मोकळ्या विहिरी, रेल्वे स्थानक, बस थांबे , प्रार्थना स्थळे इत्यादी ठिकाणी शोध घेऊनही ते सापडले नव्हते.  

दरम्यान आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. तेव्हा गावातील मारिया भवन नर्सरी स्कूलच्या मागे असलेल्या एका उसाच्या शेतात उघड्या विहिरीनजीक फेसबुक फ्रेंड सर्कलच्या टीमला चप्पल सापडले. त्यावरून फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांना विहिरीत मृतदेह असल्याची खात्री झाली. 

यावेळी बेळगाव ग्रामीण पोलिस आणि अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आदित्य राजन सहकाऱ्यांसह घटनास्थळी दखल झाले. त्यांनी सोबत श्वानपथकही आणले होते. तसेच अग्निशामक दलाचे अधिकारीही सहकाऱ्यांसह घटनास्थळी दखल झाले. 

यानंतर ७० फूट आत ओल्या मातीत विहिरीच्या तळाशी चिखलात रुतून बसलेला मृतदेह मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आला. विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी १ तास लागला. यावेळी विहिरीच्या तळाशी मृतदेह नेमका कुठे आहे, हे शोधण्यासाठी HERF रेस्क्यू टीमचे बसवराज हिरेमठ आणि राहुल पाटील यांना बोलावण्यात आले. त्यांनी नेमके ठिकाण शोधण्यासाठी पाण्यात कॅमेरे लावले असता मृतदेहाचा शोध लागला. गिल्बर्ट डायस हे व्यवसायने शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शुक्रवार (दि.२४) रोजी बेळगुंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.