बेंगळूर दि. ६ नोव्हेंबर २०२३ :
बेंगळूर सुब्रमण्यमपूर येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीत खाण आणि भूगर्भशास्त्र महिला अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा माजी कारचालक किरण याला ताब्यात घेतले आहे. प्रतिमा (वय ३७) असे खून झालेल्या खाण आणि भूविज्ञान विभागाच्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस चौकशीत किरणने खाण व भूगर्भ विभागाच्या महिला अधिकारी प्रतिमा यांची हत्या केल्याचे कबूल केले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, किरण हा खाण व भूगर्भ विभागाच्या ताब्यातील सरकारी वाहनावर गेल्या ४ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर चालक म्हणून काम काम करत होता. किरण हा बेजबाबदारपणे गाडी चालवत होता.
त्याच्या या बेजबाबदारपणामुळे गेल्याच महिन्यात एका सरकारी वाहनाचाही अपघात झाला. अपघातानंतर ते कारमधून कार्यालयात निघून गेले.
किरणच्या वागण्याने संतापलेल्या खाण व भूगर्भ विभागाच्या उपसंचालक प्रतिमा यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी त्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. यावेळी किरणने प्रतिमा यांच्याकडे याचना करून कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची विनंती केली होती. मात्र प्रतिमा यांनी किरणला पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला. याकारणामुळे किरणच्या मनात प्रतिमा यांच्या बद्दल तिरस्कार वाढला होता.
खून झाला त्या दिवशी प्रतिमा या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या आणि रात्री आठच्या सुमारास शासकीय वाहनाने घरी आल्या असता चालकाने त्यांना घराजवळ सोडले. यावेळी सूड घेण्याच्या उद्देशाने प्रतिमा घरी येण्याची वाट पाहत असलेल्या किरण याने काही मिनिटातच तिच्या घरात घुसून प्रतिमा यांच्यावर चाकूने वार करत निर्घृण हत्या केली आणि तेथून पळ काढला.
प्रतिमाचा मोठा भाऊ प्रतिश जो बीबीएमपी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने रात्री बहिणीच्या मोबाईलवर फोन केला असता, तिने उत्तर दिले नाही. दोन-तीन वेळा फोन करूनही उत्तर मिळाले नाही त्यांनी सकाळी जाऊन चौकशी करू असे सांगितले. आज सकाळी भाऊ प्रतिश बहीण प्रतिमाच्या घरी आला असता बहिणीचा खून झाल्याचे उघडकीस आले. ही बाब तात्काळ पोलीस व नातेवाईकांना कळविण्यात आली.
माहिती मिळताच सुब्रमण्यमपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. बोटांचे ठसे तज्ञ आणि श्वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी किम रुग्णालयात पाठविला. या घटनेचा तपास करताना आजूबाजूच्या रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या मारेकऱ्यांच्या चेहऱ्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रतिमा यांच्या माजी कारचालकाला अटक केली असता, त्याने खुनाची कबुली दिली आहे.
0 Comments