•  धारवाड ते  बेळगाव पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी

बेळगाव / प्रतिनिधी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्सप्रेसची आज मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी धारवाड पासून बेळगाव पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. धारवाडून दुपारी बेळगाव रेल्वे स्थानकावर तिचे आगमन झाले. तर सायंकाळी उशिरा ती बेंगळूरकडे  रवाना झाली.

यावेळी मोठ्या संख्येने बेळगावकर वंदे भारत एक्सप्रेसची झलक पाहण्यासाठी जमले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि आकर्षक स्वरूपातील वंदे भारत एक्सप्रेस पाहताच जमलेल्या सर्वांनी एकच जल्लोष केला. मेक इन इंडिया संकल्पनेतून बनवलेल्या आणि त्याचा भव्य लोगो छापलेल्या या रेल्वेचे स्वरूप पाहून सर्वजण भारावले होते अनेकांनी तिच्यानजीक थांबून सेल्फीही टिपले.

या महिन्याच्या अखेरीस बेंगळूर ते बेळगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस नियमित धावण्याची शक्यता आहे. बेंगळूरहून सकाळी ५.४५ वा. सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस सकाळी १०.५५ वा. हुबळी, सकाळी ११.२० वा. धारवाडला पोहोचेल. धारवाडहून दुपारी १.३० वा. वंदे भारत एक्सप्रेसचे बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी २ वा. ती धारवाडकडे मार्गस्थ होईल. यानंतर दुपारी ४.१५ वा. धारवाड, तर दुपारी ४.४५ ला हुबळीला पोहोचेल. हुबळीहून सुटल्यानंतर रात्री १०.१० वा. बेंगळूरला पोहोचणार आहे. 

या एक्सप्रेसने देशभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बेळगावलाही ही एक्सप्रेस यावी अशी अनेकांची इच्छा होती. मात्र केवळ बेंगलोर ते धारवाड दरम्यानच वंदे भारत सुरू झाल्याने बेळगावकरांची निराशा झाली होती. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, बेळगाव रेल्वे प्रवासी संघटना, लघु उद्योजक संघटना, व्यापारी संघटना आदींनी  तसेच लोकप्रतिनिधींनीही वंदे भारतचा विस्तार बेळगाव पर्यंत करावा अशी मागणी केली होती, त्या मागणीला अखेर यश प्राप्त झाले.

बेळगावहून वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या सुरू झाल्यास उद्योजक व्यापारी लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच बेळगावकरांची चांगली सोय होणार आहे.