- पर्यटकाचा चोरीला गेलेला लाखोंचा ऐवज हस्तगत
- परप्रांतीय चोरटे जेरबंद
गोवा दि. १७ नोव्हेंबर २०२३ :
पर्यटकांनी गजबजलेल्या गोव्यात गुन्हेगारीच्या घटना घडत असून आज शुक्रवार (दि. १७ नोव्हेंबर २०२३ ) रोजी पालघर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या किमती वस्तूंवर डल्ला मारल्याची घटना कळंगुट भागात घडली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा वेळीच शोध लागला. अफचर अली अब्दुल जलील मिया (रा. गौरवाडा, मूळचा रहिवासी गंगारामपूर, जिल्हा - दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) आणि मोछबेर अली रा. समसेर अली (रा. तुळशीदास आमदार कार्यालयाजवळ, परबवाडा कळंगुट; मूळ रा. जिल्हा- दक्षिण दिनाजपूर पश्चिम बंगाल) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कळंगुट येथे पर्यटनासाठी आलेल्या पालघर येथील व्हेनेसा डिसोझा यांची लेदर बॅग चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी कळंगुट पोलिस स्थानकात दिली होती. या बॅगमध्ये १ ऍपल आयपॅड, २ एचपी लॅपटॉप, घड्याळ, नॉईज एअरपॉड्स, वन ऍपल एअरपॉड्स, वन प्लस मोबाईल फोन असे किमती साहित्य होते.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी अफचर अली अब्दुल जलील मिया आणि मोछबेर अली रा.समसेर अली यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलीस चौकशीत त्यांच्याकडे वरील सर्व साहित्य आढळून आले. त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कळंगुट पोलीस स्थानकात त्यांच्यावर भादंवि ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments