दिवाळी २०२३ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे.दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत कायम पाळली जाते ती म्हणजे अभ्यंगस्नान. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. हे नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दरम्यान आज दि. १२ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी निमित्त जाणून घेऊया अभ्यंगस्नानाचे महत्त्व...
अभ्यंगस्नान हे दिवाळीतल्या चार दिवसांपैकी नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाला आणि बलिप्रतिपदेला केले जाते. हे स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी 7 च्या दरम्यान केले जाते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात.
- काय आहे आख्यायिका?-
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.
- शरीराला उटणे लावण्याचे वैद्यकीय महत्त्व -
शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात. तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते. अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते. महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते. यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद,मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचक - प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)
0 Comments