• बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांचा इशारा 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावात सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर यापुढे पोलीस विभागाची  करडी नजर असणार आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयामध्ये मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या सामाजिक माध्यमांवर युवक, सार्वजनिक नागरिक,  कोणताही मोठा नेता, धार्मिक गुरु असो किंवा सध्याचे सत्ताधारी नेते असोत अशा कोणावर देखील त्यांच्या भावना दुखावणारे पोस्ट रथवा वक्तव्य शेअर केल्यास मॉनिटरिंगच्या माध्यमातून ते आम्हाला तात्काळ समजणार आहे. तसेच सदर कृत्य करणाऱ्यावर भा.द.वि. कलम १५३ (अ), २९५ (अ), आरटीआय ॲक्ट ६० अंतर्गत संबंधितांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावातील खडेबाजार आणि शहापूर येथील प्रक्षोभक पोस्ट प्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली आहे. शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारी कृत्ये आणि धर्म जात भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अपमानास्पद पोस्ट करणे हा गंभीर गुन्हा आहे तेव्हा आमच्या विभागाच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग द्वेष आणि प्रक्षेपक पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

वाद भडकवणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करणे, लाईक आणि कमेंट करणे हा देखील गुन्हा मानला जाईल आणि दोषी व्यक्ती किंवा गटांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवांना थारा देऊ नका, पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईलवर लक्ष ठेवून मुलांना नियंत्रणात ठेवावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇