•  लोकायुक्त पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

स्वीकारलेल्या लाचेची रक्कम परत करताना प्रथमच एका बाल विकास प्रकल्पाधिकार्‍याला (सीडीपीओ) लोकायुक्त पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण पी. बजंत्री असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अधिकाऱ्यासह त्याच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आली आहे. ऑनलाईन सेवाकेंद्रचालक अदृश्यप्पा  तडलसूर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

तडलसूर हा 'गृहलक्ष्मी' योजनेतील लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेत होता. (महिलांना दरमहा २००० रु.) याप्रकरणी महिला आणि बालकल्याण खात्याने २७ जुलै रोजी तडलसूर याच्या मालकीच्या जनता ऑनलाईन केंद्रावर कारवाई केली होती. २५० रुपये घेऊन गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी करून घेतली जात असल्याचा आरोप करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ऑनलाईन सेंटरची मान्यता रद्द करत टाळे ठोकले होते. त्यामुळे तडलसूर यांनी बालविकास प्रकल्पाधिकारी बजंत्री यांच्याशी संपर्क साधून कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. त्यावर बजंत्री याने तडलसूर यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र सामान्य ऑनलाईन सेवाकेंद्राचे सील खोलू न शकल्याने बजंत्री याने लाचेची रक्कम परत करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार बजंत्री याने २५,००० रुपये रोख देण्यासह उर्वरित पंधरा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्याचे आश्वासन तडलसूर याला दिले. तसेच आपला वाहन चालक महांतेश मादर याच्याकडून तडसलूर याच्याकडे २५ हजार रोख रक्कम सुपूर्द केली. यावेळी लोकायुक्तांनी रंगेहात पकडले. लोकायुक्त पोलीस निरीक्षक निरंजन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.