• विराट कोहलीची ९५ धावांची झुंजार खेळी
  •  पॉईंट्स टेबल मध्ये टीम इंडिया अव्वलस्थानी 

धर्मशाला दि. २२ ऑक्टोबर २०२३ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या विश्वचषकाच्या २१ व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. तब्बल २० वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा विश्वचषक सामन्यात पराभव केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने टीम इंडियाने विजयादशमी साजरी केली आहे.

डॅरिल मिचेलच्या (Daryl Mitchell) शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाला २७४ धावांचे आव्हान दिले होते. विराट कोहली (Virat Kohli) याच्या संयमी रनचेसने टीम इंडियाला विजय साकारता आला आहे. त्याचबरोबर आता टीम इंडिया पॉईट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या ११ षटकांमध्ये ७० धावा फलकावर लावल्या होत्या. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने सलामी जोडी तंबूत पाठवली. मात्र, मैदानात विराट कोहली पाय रोऊन ऊभा होता. विराटने एक बाजू लावून धरली अन् दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर धावा कुटत होता. श्रेयसनंतर केएल राहुल देखील २७ धावा करत बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. विराटच्या एका चुकीमुळे सूर्यकुमार यादवची विकेट गेली, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, विराटला आपली चूक कळाली अन् अखेरपर्यंत टिकून त्याने टीम इंडियाचा विजय पक्का केला. त्याने ९५ धावांची झुंजार खेळी केली. 

धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या १० षटकांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शमीने फासे आवळले अन् न्यूझीलंडची धावगती रोखली. दोन्ही सलामीवीर तुंबत परतल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी संयमी धावा केल्या. १७८ वर टीम इंडियाला तिसरा बळी मिळाला. त्यानंतर डॅरिल मिचेल याने १०० चेंडूमध्ये शतक झळकावले मात्र, टॉम लिथमच्या विकेटनंतर न्यूझीलंडचा डाव ढासळला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.  डॅरिल मिचेलने अखेरीस आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याने १३० धावा केल्या. विराटने बॉन्ड्रीवर एक अप्रतिम झेल घेत.  न्यूझीलंडचा खेळ संपवला. न्यूझीलंडचा निर्धारित ५० षटकांमध्ये सर्व गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावांवर समाधान मानावे लागले. भारताक़डून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पाच  गडी बाद केले.