बेळगाव / प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात येणारी दुर्गामाता दौड आज आठव्या दिवशी बेळगाव दक्षिण भागातील शहापूर भागात पार पडली. दौडीमुळे शहापूर भागात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रारंभी शहापूर येथील श्री अंबाबाई मंदिरापासून दौडला प्रारंभ करण्यात आला.दौडच्या मार्गावर महिलांनी सुबक अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या, तर  झेंडूच्या फुलांची आकर्षक आरास, भगव्या पताका, फेट्यांची तोरणे आणि भगवे ध्वज लावून दौडच्या स्वागतासाठी मुले आणि युवकांनी विशेष सजावट केली होती.

विविध ठिकाणी दौडमधील धारकऱ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. गल्लोगल्ली महिलांनी औक्षण करून दौडचे स्वागत केले.दौडवेळी ध्वनि प्रक्षेपकावर लावलेली राष्ट्रभक्तीपर गीते, जय भवानी, जय शिवाजी,  छ. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की अशा घोषणांनी दौडमध्ये सहभागी धारकरी आणि युवक - युवतींचा उत्साह वाढत होता.

शहापूर येथील अंबाबाई मंदिर पासून सुरू झालेल्या दौडची पुढे लक्ष्मी रोड कारभार गल्ली, नवी गल्ली, डबल रोड,बसवेश्वर चौक, बाजार गल्ली बनशंकरी नगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मर्गम्मा गल्ली वर्धाप्पा गल्ली, उप्पारगल्ली संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, सराफ गल्ली, बिच्छू गल्ली, महात्मा फुले रोड, मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, दाणे गल्ली, कोरे गल्ली मार्ग बसवेश्वर सर्कल गोवावेस  येथे सांगता झाली.

अंगावर पांढरे शुभ्र कपडे. डोक्यावर भगवे फेटे - टोप्या घातलेले हजारो युवक - युवती, लहान मुले आणि जेष्ठ उत्साहाने या दौडमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये किशोरवयीन युवक युवतींचा सहभाग लक्षणीय होता.