खानापूर / प्रतिनिधी
कापोली (ता. खानापूर) नजीक अस्वलाच्या हल्ल्यात घोसे खुर्द येथील शेतकरी ठार झाला. भिकाजी मिराशी असे अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्याच्या नातेवाईकांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कापोली गावाजवळील घोसे खुर्द गावातील शेतकरी भिकाजी मिराशी हे काल शनिवार दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी कुटुंबियांना सांगून शेताकडे गेले होते. परंतु रात्री उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांचा शोध लागला नाही. शेवटी आज सकाळी शेतात जाऊन शोध घेण्यात आला असता एका ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या अंगावर ओरबडलेल्या खुणा होत्या. त्या खुणा पाहिल्यानंतर अस्वलाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर नजीकच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments