बेळगाव / प्रतिनिधी

मानवी तस्करी आणि छळ थांबवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगावात उद्या विविध संस्थांतर्फे भव्य मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. महिला कल्याण संस्थेच्या योजना संचालिका सुरेखा पाटील यांनी आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी सुरेखा पाटील पुढे म्हणाल्या, मूव्हमेंट इंडिया, मुंबई, त्रिलेट मीडिया लिमिटेड आणि बेळगावच्या महिला कल्याण संस्थेतर्फे मानवी तस्करी आणि मुलांचा छळ याबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या शनिवारी सकाळी ८ वाजता जागृती पदयात्रा काढण्यात येणार आहे. बेंगळूरनंतर महिला-मुलांची तस्करी, त्यांना वाममार्गाला लावणे अशा घटनात बेळगाव दुसऱ्या स्थानी आहे. बेळगाव शहर हे तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने येथे हे प्रकार वाढीस लागले आहेत. महिला बेपत्ता होण्याच्या, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रकरणात लक्षणीय वाढ झाली आहे. बेळगावात वाढणारी लैंगिक प्रकरणे आणि पॉक्सो प्रकरणे रोखण्यासाठी महिला कल्याण संस्थेचे महिला विकास म्हणून उज्वला महिला पुनर्वसन केंद्र आणि हेल्पलान केंद्र कार्यरत आहेत.

एकूणच या संदर्भात जागृती करण्यासाठी उद्या सकाळी सरदार हायस्कूलपासून जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, काकतीवेस रोड, शनिवार खूट, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कॉलेज रोडमार्गे पुन्हा सरदार हायस्कूल मैदानावर येऊन त्याची सांगता होईल. विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, अंगणवाडी-आशा कार्यकर्त्या आदी यात सहभाग होणार आहेत.पत्रकार परिषदेला डॉ. पूजा, सुमित, हेन्री चन्नय्या आदी उपस्थित होते.