• नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

इंदिरा कॅन्टीन हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, राज्यात १८८ नवीन इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी सांगितले. बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील इंदिरा कॅन्टीनला भेट दिल्यानंतर त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतानाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, यापूर्वीच्या भाजप सरकारने इंदिरा कॅन्टीनची जाणीवपूर्वक दुरवस्था केली होती. या प्रकल्पाची बदनामी करण्याच्या उद्देशाने गैरव्यवस्थापन करण्यात आले. त्यामुळे कॅन्टीन बंद होण्याच्या टप्प्यावर पोहोचली होती. 

मात्र, आता सर्व कॅन्टीन पूर्ववत करण्यासाठी काँग्रेसने २४० कोटी रुपये खर्च केले आहेत. कोणत्या भागात  कोणते  खाद्यपदार्थ खास आहेत त्याच्या सर्व्हे सुरू असून बेळगाव भागात भाकरी (रोटी) जेवण, बंगळूरमध्ये भाताची इडली इ.अशा पदार्थांना प्राधान्य दिले जात असल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी महापालिका प्रशासन, आमदार आसिफ (राजू) सेठ, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सय्यद मन्सूर यांच्यासह महानगर महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.