बेळगाव / प्रतिनिधी 

१ नोव्हेंबर काळ्या दिनी मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी. तसेच काळ्यादिनी निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. सीमाप्रश्न निर्माण झाल्यापासून प्रत्येक आंदोलन असो वा काळ्या  दिनाची फेरी प्रशासनाकडून नेहमीच टाळाटाळ व चालढकल केली जाते. यंदाही अशाचप्रकारे काळ्या दिनाला परवानगी नाकारून प्रशासनाने मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये  संतापाची लाट पसरली आहे.

भाषावार प्रांतरचना होऊन मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाला मनाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे. कन्नड संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे.

बेळगावात जिल्हा पंचायत सभागृहात आज गुरुवारी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली.या बैठकीत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी राज्योत्सवादरम्यान काळा दिन साजरा करण्याची संधी नसल्याचे सांगितले. 

ते म्हणाले की, काळा दिवस साजरा होऊ देणार नाही. नितेश पाटील यांच्या आदेशाचे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागत केले.कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाचे राज्य समन्वयक महादेव तळवार म्हणाले की, महाराष्ट्र सरकार सीमेवर कार्यालय सुरू करत आहे. सीमाभागातील कन्नड - मराठी फूट पाडण्याचे काम करत आहे. हे तातडीने शासनाच्या निदर्शनास आणून याला आळा घालावा. काळा दिवस साजरा करण्याची परवानगी देऊ नका, याबाबत करवे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले आहे.

बैठकीच्या सुरुवातीलाच, महाराष्ट्र सरकारने काल मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत घेतलेल्या बैठकीचा विषय नमूद करण्यात आला. महाराष्ट्र सीमाभाग उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी मुंबईत म. ए. समितीच्या  सदस्यांसोबत बैठक घेतली. सगळे मराठीत बोलत असल्याने काय चालले आहे ते कळत नाही. पण कर्नाटकच्या नावाचा उल्लेख ऐकायला मिळतो. सीमेवरील मराठी भाषिकांना एकत्र आणण्याबाबत ते बोलत असल्याचे दिसते अशी चर्चा करण्यात आली असे कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.