बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये पेरणीच्या काळात तीन आठवड्यांहून अधिक काळ पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र पंधरा तालुक्यांपैकी बेळगाव व खानापूर वगळता १३ तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाशी बोलताना ते पुढे म्हणाले, जून महिन्यात पेरणीचे कोणतेही काम सुरू झाले नाही. पाऊस पडला नाही.जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यानंतर शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला, त्यामुळे पेरणीची कामे सुरू झाली. ऑगस्टमध्ये पाऊस न पडल्याने राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती, असे सांगून त्यांनी पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची कमतरता, चाऱ्याची कमतरता आणि समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.कर्नाटक राज्य कृषी विभागाच्या आयुक्तांनी अनेक गावांमध्ये जून आणि जुलै महिन्यात पाऊस नसल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यानंतर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, कर्नाटक राज्य कृषी विभागाच्या आयुक्तांनी बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्यांतील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. 

याप्रसंगी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, कृषी विभागाचे अधिकारी डॉ.व्ही.जे.पाटील, बेळगाव जिल्हा सहसंचालक शिवनगौडा पाटील, उपसंचालक डॉ.एच.डी.पाटील, फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ.राजीव उपस्थित होते.