•  बेळगाव महापालिकेतील फाईल गायब प्रकरणी घडामोडींना वेग

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव महापालिकेतील फाईल गायब झाल्या प्रकरणी मार्केट पोलिसांनी महापौर शोभा सोमनाचे यांच्या घरावर पोलीस स्थानकात हजर राहण्याबाबत नोटीस चिकटवली. त्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांच्यावतीने महापालिकेतील सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी यांनीही मार्केट पोलीस स्थानकात जाऊन नोटिसीला उत्तर देऊ असे निवेदन देत तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक रवी धोत्रे व अन्य उपस्थित होते. 

महापालिकेतील फाईल गायब झाल्यानंतर कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांनी महापौर शोभा सोमनाचे यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दिली त्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी झाली. त्यामध्ये बेंगळूर येथील नगर प्रशासन संचालनालयाने महापालिकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेतील राजकारणाला वेगळे वळण लागत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नोटिसीला उत्तर देताना तारखेची नोंद चुकीची केली. त्यानंतर सत्ताधारी भाजप पक्षाने त्यांना लक्ष बनवले. या प्रकारानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी त्यांनी सभागृहात उपस्थित राहून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा आटोपती घेऊन तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर फाईलबाबत चौकशी केली असता ती फाईलच गायब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर सतीश जारकीहोळी यांनी कौन्सिल सेक्रेटरींना दोषी ठरविले होते.

आयुक्त अशोक दुडगुंटी यांना कौन्सिल सेक्रेटरी विरोधात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर कौन्सिल सेक्रेटरींनी सदर फाईल महापौरांनी नेल्याची सांगितले. यामुळे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन महापौरांच्या विरोधात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर उमा बेटेगेरी यांनी तक्रार दिली. आता महापौर यांनीही तक्रारीस उत्तर दिले आहे. एकूणच या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला असून साऱ्यांचेच लक्ष याकडे लागले आहे.