• श्वानाला बिबट्याप्रमाणे रंगवून दिल्या वेदना

बेळगाव / प्रतिनिधी

माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही भावना असतात. यांच्याशी जवळीक साधली तर ते माणसांचे मित्र बनतात. मात्र काळाच्या ओघात काही वेळा प्राणिमात्रांची क्रूर चेष्टा होत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात याचेच प्रत्यंतर घडविणारा एक धक्कादायक प्रकार  बेळगाव शनिमंदिरनजीक पाहायला मिळाला.

येथे फिरणाऱ्या एका भटक्या कुत्र्याला काही अज्ञातांनी बिबट्याप्रमाणे रंगवले होते. बिचाऱ्या मुक्या कुत्र्याला स्वतःच्या वेदनाही कोणाला सांगता येत नव्हत्या. अशा परिस्थितीत रंगामुळे अंगाला प्रचंड खाज सुटल्याने चिडचिड करत तो इतरत्र भटकत होता.

ही बाब समजताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांनी कुत्र्याला पाण्याने स्वच्छ धुऊन रंग घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र रंग काही केल्या निघत नव्हता. यावेळी अवधूत तुडवेकर यांनी निर्दयीपणे मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका असे आवाहन केले.