- संस्कृतीचे जतन अन् सामाजिक एकोपा राखण्याचा संदेश
बेळगाव / प्रतिनिधी
संस्कृतीचे जतन आणि सामाजिक एकोपा निर्माण करण्याच्या उद्देशाने नवरात्रीनिमित्त शिवप्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात येणारी दुर्गामाता दौड आज सहाव्या दिवशी उत्साहात पार पडली. अंगावर पांढरे कपडे, डोक्यावर भगवे फेटे आणि टोप्या हातात भगवे ध्वज घेऊन हजारो युवक - युवती दौडमध्ये सहभागी झाले होते.
प्रारंभी खासबाग येथील श्री दुर्गामाता मंदिरात सहाव्या दिवशीच्या दौडला सुरुवात झाली. दौडच्या मार्गावर महिलांनी आकर्षक आणि सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. अनेक ठिकाणी दौंड मध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. गल्लोगल्ली महिलांनी औक्षण व भगव्या ध्वजाला वंदन करून दौडचे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित सजीव देखावे उभारण्यात आले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी उपमहापौर मधुश्री पुजारी म्हणाल्या, रामदेव गल्ली वडगाव येथे दरवर्षीप्रमाणे दुर्गामाता दौड कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. यंदाही यामध्ये महिला व युवक मंडळांसह सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. "छत्रपती शिवरायांची धर्म आणि राष्ट्रभक्तीची परंपरा आम्ही पुढे सुरू ठेवू आणि पुढच्या पिढीला ही मार्गदर्शन करू. यंदाचा दौडचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कल्याणीनगर वडगाव येथील रहिवासी संगिता कुंटे यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही हा दुर्गामाता दौड कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. या नऊ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव असतो. या उत्सवात तरुणींनी सहभागी असे आवाहन त्यांनी केले.
तर बाजारगल्ली येथील एका महिलेने दरवर्षी आपण दुर्गादेवीच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहतो. दुर्गामाता दौडच्या निमित्ताने रस्त्यावर विविध ठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. या दौडमध्ये लहान मुलेही सहभागी झाली होती. हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी अंबिका कुंटे यांनी, आम्ही पंचवीस वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी होऊन नऊ दिवस भक्तिभावाने पूजा करतो. तसेच घरातील प्रत्येक जण दुर्गामाता दौड मध्ये सहभागी होतो असे त्यांनी सांगितले.
भारतनगर १ ला क्रॉस, बॅ. नाथ पै सर्कल, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, भारतनगर चौथा व पाचवा क्रॉस, रयत गल्ली, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली वडगाव मेन रोड, बाजार गल्ली मारुती गल्ली तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड गणेश पेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली कोरवी गल्ली,संभाजी गल्ली, लक्ष्मी गल्ली,बस्ती गल्ली, खन्नूकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली नाझर कॅम्प क्रॉस ३, हरिजनवाडा, हरी मंदिर, विठ्ठल गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, धर्मवीर संभाजी नगर मार्गे पाटील गल्ली मंगाई देवी मंदिर येथे दौडची सांगता झाली. एकंदरीत गेल्या पाच दिवसांप्रमाणे आज सहाव्या दिवशीही बेळगावकरांचा दौडला उदंड प्रतिसाद लाभला.
0 Comments