- शिवाजीनगर, गांधीनगर भागात दुसऱ्या दिवशीच्या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयघोषात आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बेळगाव शहरातील शिवाजीनगर,गांधीनगर भागात दुर्गामाता दौड काढण्यात आली.प्रारंभी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरात पूजन करून आजच्या दिवशीच्या दौडला प्रारंभ झाला.
कोर्ट परिसर, खडक गल्ली,चव्हाट गल्ली शिवाजीनगर,गांधीनगर या भागात अनेक ठिकाणी दौड मधील धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दौडच्या मार्गावर विविध ठिकाणी सुहासिनींनी धारकऱ्यांचे औक्षण करून उत्साहात दौडचे स्वागत केले. दुर्गादेवी व धर्म रक्षणाच्या स्फूर्ती गीतांनी संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. विविध ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग साकारणारे देखावे सादर करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी शिवराय व अन्य देवतांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले होते. दौडच्या मार्गावर सुबक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.
दौडमध्ये लहानपणापासून सहभागी होत आहे. आज शिवाजीनगर तिसरी गल्ली येथे दौडचे उत्साहात स्वागत केले. हिंदूधर्म टिकण्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी अशा उपक्रमांची खूप गरज आहे. आजच्या स्मार्ट युगात आधुनिकतेच्या नावाखाली युवा पिढी भरकटत चालली आहे. त्यांच्यावर संस्कार करून त्यांना अध्यात्म च्या मार्गावर आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याच्या प्रतिक्रिया दौडी दरम्यान उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या.
काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट परिसर, चव्हाट गल्ली, पीबी रोड आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड गांधीनगर भागात फिरून किल्ला परिसरातील श्री दुर्गामाता मंदिरात दौडची सांगता झाली.
पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर टोप्या घालून, हातात भगवे ध्वज घेतलेल्या धारकऱ्यांसह बेळगाव शहर परिसरातील असंख्य युवक - युवती या दौडमध्ये सहभागी झाले होते. दौंड शांततेत पार पडावी या करता ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकंदरीत आजच्या दुसऱ्या दिवशीच्या दौडला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
0 Comments