सुळगा (हिं.) / वार्ताहर 

किरकोळ वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाल्याने धारदार शस्त्राने वार करून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. गोजगा (ता. बेळगाव) येथे आज शनिवारी दुपारी  १.३० वा. सुमारास ही घटना घडली. मारुती नाईक (वय ३२, रा. नाईक गल्ली गोजगा) असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, राजू बंडू नाईक (वय ३२) व मारुती नाईक (वय ३२) यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैमनस्य होते. त्यातून अनेकदा वादही झाले होते. आजही अशाच प्रकारे क्षुल्लक कारणातून वादाची ठिणगी पडली. यावेळी वादाचे पर्यावसान भांडणात झाल्याने राजू याने मारुतीच्या पोटावर धारदार विळ्याने वार केला. या हल्ल्यात मारुती गंभीररित्या जखमी झाला. यावेळी मारुतीला तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णालयात गेल्यानंतर मारुतीने प्राण सोडला, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी जिल्हा रुग्णालयासमोर गर्दी केली होती. या घटनेबाबत पोलीस तपास सुरू आहे.