• एचईआरएफ रेस्क्यूटीम, सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील आणि ग्रामस्थांचा पुढाकार 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

वेंगुर्ला रोड सुळगा (उ.) (ता. बेळगाव) येथे रक्ताच्या उलट्या करून कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला बेळगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मदत कार्यात एचईआरएफ रेस्क्यूटीम, सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.पं. सदस्य बाळू पाटील आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली. प्रकाश यशवंत भाईडकर (वय ३८ रा. मूळ वेंगुर्ला महाराष्ट्र ; सद्या रा. माळमारुती बेळगांव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, आज रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी वेंगुर्ला रोड सुळगा (उ.) येथे  दुपारी १२.१० च्या सुमारास  इनोव्हा कार  (क्र. केए -२२ झेड ५३१३) मध्ये एक व्यक्ती रक्ताच्या उलट्या करून बेशुद्धावस्थेत आढळून आला. हे निदर्शनास येताच सुळगा येथील ग्रामस्थांनी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेशी संपर्क साधला पण  रुग्णवाहिका लवकर आली नाही. यावेळी जागरूक ग्रामस्थांनी तात्काळ एचईआरएफ रेस्क्यूटीम बेळगांवशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच एचईआरएफ रेस्क्यूटीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ हे आपल्या टीमसह १० ते १५  मिनिटांमध्ये  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीवर प्रथोमउपचार करून त्याला शुद्धीवर आणले. याच दरम्यान रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. यानंतर सदर व्यक्तीला रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी बेळगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रुग्णालयात गेल्यानंतर कागदपत्रे मिळाली पण त्याचा मोबाईल लॉक होता आणि स्विच ऑफ  झाला होता. त्यानंतर एचईआरएफ रेस्क्यूटीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी  व्हिडीओ करून युट्यूबच्या साह्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे नातेवाईक आल्याची माहिती मिळाली. या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सुळगा येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.