- जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांची माहिती
- दोन्ही तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा
बेळगाव / प्रतिनिधी
पावसाअभावी बेळगाव व खानापूर तालुक्यातील पिकांचे नुकसान व दुष्काळी परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला असून, विशेष अहवाल तातडीने शासनाला सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी बुधवारी खानापूर व बेळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पावसाअभावी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली.
यावेळी शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, बटाटा, रताळे, कोबी, शेंगदाणे आदी पिकांचे झालेले नुकसान व चारा टंचाई याबाबत माहिती घेण्यात आली. बेळगाव तालुक्याच्या तारिहाळ गावातील रामलिंग भीमण्णा नायक त्यांच्या तीन एकर भात पिकाचे झालेले नुकसान तसेच सोमनिंग कनगमकार यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे मारुती गौंडवाडकर यांच्या शेतातील बटाटा व सोयाबीन पिकाच्या नुकसानीसह चंदन होसूर गावातील अण्णाप्पा पाटील यांच्या शेतातील कोबी पिकाच्या नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हवामान थंड असल्याने ओलावा आहे. मात्र उत्पन्न येणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, शिवनगौडा पाटील, उद्यान विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोडा, पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ.राजीव कुले, बेळगावचे तहसीलदार आदी उपस्थित होते.
- खानापूर तालुक्यातील पाहणी दौरा -
बेळगाव तालुक्यातील पाहणी पूर्ण करून जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील आणि जि. पं. मुख्यकार्यकरी अधिकारी हर्षल भोयर यांनी खानापूर तालुक्यातील कौंडाळा, लालवाडी, जंजवाडा के.एन., बिडी. भुरणकी, मंगेनकोप्प, केरवडा आदि गावांना भेटी देऊन धान्य, सोयाबीन, इतर पिकांचे नुकसान आणि तेथील चारा टंचाईची पाहणी केली.या दोन्ही तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून सर्वंकष माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी व फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
- कृषी सहसंचालक - फलोत्पादन उपसंचालकांनी दिली नुकसानीची माहिती -
कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी बेळगाव व खानापूर तालुक्यातील पिकांच्यानुकसानीची माहिती दिली. फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरागोडा यांनी फळबाग पिकाची माहिती दिली. पावसाअभावी दोन्ही तालुक्यांमध्ये चाऱ्याचीही टंचाई निर्माण होणार असल्याचे पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ.राजीव कुले यांनी सांगितले.
0 Comments