बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावच्या पारंपरिक गणेशोत्सवा दरम्यान शहरातील समस्या व गैरसोयींमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांना त्रास होऊ नये याकरिता महापालिकेने शहरात विविध ठिकाणी विकासकामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शहरातील कपिलेश्वर तलावानजीक विविध विकास कामांना महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून चालना देण्यात आली. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर शोभा सोमनाचे यांनी बेळगावकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  बेळगाव महापालिकेने गणेश विसर्जनासाठी पारंपारिक कपिलेश्वर तलावाच्या  दुरुस्तीचे काम हाती घेतले असून गणेशोत्सवापूर्वी साफसफाई देखील पूर्ण केली जाईल, असे त्या म्हणाल्या. 

या विकास कामांतर्गत कपिलेश्वर तलावाच्या भिंतीचे बांधकाम, दुरुस्ती आणि साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच कपिलेश्वर गणेश विसर्जनासाठी मंदिरासमोरील जुन्या विसर्जन तलावाच्या एका बाजूची छोटी भिंत कोसळली असल्याने त्याठिकणी नवीन भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच काही दुरुस्ती व साफसफाईची कामे केली जाणार आहेत.