• विसर्जनासाठी शहर सज्ज : कडेकोट पोलिस बंदोबस्त 

बेळगाव / प्रतिनिधी 

पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतरची मोठी आणि आकर्षक असणारी विसर्जन मिरवणूक म्हणून बेळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे पाहिले जाते. याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. त्यामुळे महामंडळासह प्रशासनानेही विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे.

लाखो भाविकांना उत्साह देणाऱ्या यंदाच्या सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचे सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळासह , जिल्हा प्रशासनाने नेटके नियोजन केले आहे. आज गुरुवार (दि.२७)  रोजी दुपारी चार वाजता  हुतात्मा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

शहर परिसरातील विसर्जन तलाव सज्ज ठेवण्यात आले असून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. धर्मवीर संभाजी चौकात मिरवणूक मार्गावर नागरिकांना विसर्जन मिरवणूक पाहता यावी याकरिता प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. शहरात पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुपारी चार वाजता लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला हुतात्मा चौकातून प्रारंभ होईल. त्यानंतर रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदेखूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, शनी मंदिर चौक यानंतर कपिलेश्वर पुलावरून कपिलेश्वर तलावाकडे विसर्जन मिरवणुकीची सांगता होईल.

यंदा बहुतांश मंडळाच्या मूर्ती या १५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मिरवणूक लवकर सुरू करून सुरळीत व शांततेत पार पडावे असे आवाहन गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.