•  दैव बलवत्तर म्हणून वाचला दुचाकीस्वार 

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी - हरूरी गावांच्यामध्ये दोन पिल्लांसह वावरणाऱ्या एका अस्वलाने दुचाकी स्वारावर हल्ल्याचा प्रयत्न केला.  सदर घटना आज सकाळी 9.30 दरम्यान घडली. दुचाकी वेगात पाठविल्याने दुचाकीस्वार बचावला. ही घटना पाठीमागून चालत शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरवरून पाहिली. घाबरलेल्या त्या मुलांनी धावत ढोकेगाळी गावातील स्वतःचे  घर गाठले. 

या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याकरीता  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ढोकेगाळी गावाला भेट देऊन सदर अस्वलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ढोकेगाळी, हरूरी  परिसरातील नागरिकांतून होत आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार ढोकेगाळी गावातील नागरिक सोनाप्पा शटवाप्पा पाटील, हे नागरिक दुचाकीवरून हारूरी गावाकडे जात असताना, रस्त्याच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन पिल्ले असलेले, अस्वल त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी  पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, त्या अस्वलाने जोरात ओरडून, किंकाळी मारली व दुचाकीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आधीच सावध असलेले सोनाप्पा यांनी दुचाकी जोरात पळवली व आपला जीव वाचविला. अस्वलाच्या ओरडण्याचा आवाज व सोनाप्पा यांच्या पाठीमागे धावत असलेले अस्वल हे दृष्य शाळेला जात असलेल्या मुलांनी  पाहिले व घाबरून आपला जीव वाचविण्यासाठी धावत स्वतःचे गाव गाठले. 

मुलांनी सदर घटना ग्रामस्थांना सांगितली असता, गावातील नागरिक परशराम पाटील  व इतर नागरिकांनी दुचाकीवरून सदर मुलांना हरूरी येथील शाळेत सोडले. सदर दोन पिल्ले असलेले अस्वल सद्या ढोकेगाळी परिसरातील जंगलात असून त्याचा ओरडण्याचा व किंकाळ्याचा आवाज गावात येत असल्याचे  परशराम पाटील यांनी सांगितले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सदर अस्वलाचा बंदोबस्त करून पुढील होणारा अनर्थ टाळावा  अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.