•  गळफास घेऊन संपविले जीवन 

बेळगाव / प्रतिनिधी  

वेळेवर पगार मिळत नसल्याने तसेच  कंत्राटदार आणि पर्यवेक्षकाकडून होणारा मानसिक छळ सहन न झाल्याने एका सफाई कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. क्रांतीनगर गणेशपूर (बेळगाव) येथे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शशिकांत सुभाष ढवळे असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन  सफाई कामगाराचे नाव आहे. शशिकांत ढवळे हा गेल्या बारा वर्षांपासून बेळगाव महापालिकेत  एन. डी. पाटील या सफाई ठेकेदाराकडे  मजूर म्हणून काम करत होता. आर्थिक अडचणींमुळे शशिकांत याने सदर ठेकेदाराकडून २० टक्के व्याजाने एका वर्षासाठी ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. वर्ष होताच शशिकांत याने ठेकेदार एन. डी. पाटील यांना व्याजासह १ लाख ३० हजार रुपये परत केले. मात्र ठेकेदार एन.डी.पाटील व पर्यवेक्षक शंकर हडकर यांनी अधिक पैशांची मागणी करत त्याला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मानसिक दडपणाखाली आलेल्या शशिकांतने मध्य प्राशन केले आणि गुरुवार दि. ३१ ऑगस्ट  २०२३ रोजी रात्री घरातील सर्वजण झोपलेले असताना  गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

आज शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर हा शशिकांतने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्याचे शशिकांतची पत्नी प्रियंका यांनी  सांगितले.

दरम्यान, सरकारी कर्मचारी शशिकांत यांच्या आत्महत्येनंतर बेळगावातील दलित संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले यांनी शशिकांत ढवळे बेळगाव महापालिकेत गेल्या १०-१२ वर्षांपासून स्वच्छता कंत्राटदार म्हणून कार्यरत होता. मात्र वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे त्याने ठेकेदार एन. डी. पाटील यांच्याकडून २० टक्के व्याजाने ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ठेकेदाराने चक्रवाढ व्याज आकारले. शशिकांतने ८० हजारांचे १ लाख ३० हजार रुपये परत केले असले तरी अधिक रकमेसाठी ठेकेदार एन. डी. पाटील आणि त्यांचा पर्यवेक्षक शंकर हडकर हे शशिकांतला छळत होते. एकूण दीड लाख रुपये देण्यासाठी शशिकांतचा पगारही रोखण्यात आला होता. त्यांना पत्नी आणि चार मुले आहेत. डोंबारी समाजातील शशिकांत हा अनुसूचित जातीचा असून, त्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा प्रकारे त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार एन. डी. पाटील व पर्यवेक्षक शंकर हडकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई व पत्नीला मजुरी द्यावी, असा इशारा मल्लेश चौगुले यांनी दिला आहे.

दरम्यान, शशिकांतच्या मृत्यूला न्याय मिळावा यासाठी गणेशपूरच्या डोंबारी समाजातील नागरिकांनी कॅम्प पोलिस स्थानकासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ठेकेदार व पर्यवेक्षकाचा छळ सहन न झाल्याने कामगाराने आत्महत्या केल्याने दलित संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.एकंदरीत  या घटनेनंतर  ठेकेदार व पर्यवेक्षक यांच्यावर सरकार कोणती कारवाई करणार  याकडे सर्वांचे लक्ष आहे.