• डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याची नातेवाईकांची तक्रार 

गडहिंग्लज / प्रतिनिधी 

निडसोशी येथील सरकारी दवाखान्यात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. किरण मोहन टिक्के (वय २४, रा. कोणकेरी ता. हुक्केरी ) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (४) सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यु झाल्याची तक्रार नातेवाईकांनी संकेश्वर पोलीसात दिली आहे.

पोलीसातून मिळालेली माहिती अशी, गिजवणे येथील आप्पासाहेब कडूकर यांची मुलगी किरण हिचा पाच वर्षापुर्वी मोहन टिक्के यांच्याशी विवाह झाला होता. मंगळवारी (२५) जुलै रोजी तिला प्रसुतीसाठी निडसोशी येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया प्रसुतीनंतर त्यांना मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले याची माहिती डॉक्टरांना दिली. परंतु डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. 

दरम्यान, शस्त्रक्रियेच्या जागी दुखत असल्यामुळे गडहिंग्लज येथे सोनोग्राफी करण्यात आली. परंतू शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तिचा मृत्यु झाला. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यु झाला असल्याची तक्रार पोलीसात दिली. बेळगाव येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मोहन टिक्के यांच्या फिर्यादीवरून संकेश्वर पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक एस.एम.आबजी तपास करत आहेत.