•  भाजपाच्या सुरेश घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटामध्ये) प्रवेश 

चंदगड / प्रतिनिधी 

बूल्य प्रिंट तयार करून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस घेऊन तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ गटाला हादरा देत एकहाती सत्ता मिळवत भाजपचे उद्योजक सुरेश घाटगे यांनी आपल्या पत्नीला सरपंचपदी विराजमान केले होते. मात्र राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केल्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे.

मितवाषी स्वभावाचे व बाळूमामांचे निःसीम भक्त म्हणून किणी कर्यात भागासह तालुक्याला परिचित असलेले उद्योजक सुरेश घाटगे यांनी सहाच महिन्यांपूर्वी भाजपच्या झेंड्याखाली पॅनल बनवून तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत सत्तारूढ कोकितकर गटाला धोबीपचाड दिला होता . त्यावेळी त्यांनी प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हायटेक प्रचार यंत्रणा राबवली. गावची ब्लू प्रिंट घेऊन ते मतदारांसमोर गेल्याने मतदारांनीही त्यांना कौल देत ग्रामपंचायतची सत्ता त्यांच्या हाती सोपवली.

मात्र गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या उलथापालथीमुळे चंदगड तालुक्यातील विद्यमान आमदार राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट नेतृत्वहीन झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडून गटाची पुढील धुरा चंदगड विधानसभा मतदारसंघात  निभावणाऱ्या उमेदवाराची शोध मोहीम सुरू होती. अशावेळी उद्योजक सुरेश घाटगे यांचे नाव पुढे आले वरिष्ठ पातळीवरही त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे शुक्रवारी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात आला. यावेळी कुदनूरच्या सरपंच संगीता घाटगे व उद्योजक सुरेश घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये नवचैतन्य आले आहे. 

  • तिकिट वाटपावेळी नावाचा विचार शक्य  

तरुण उद्योजक सुरेश घाटगे यांचे तालुक्यातील तरुणवर्गाशी तसेच किणीकर्यासह सर्वच भागातील लोकांशी वैयक्तिक व जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला म्हणजेच पर्यायाने महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यामुळे विधानसभेच्या तिकीट वाटपावेळी त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

  • पक्षाचा आदेश आल्यास तयार 

गावाप्रमाणे तालुक्याची विकासाची मोट बांधण्यासाठी आपली ब्लू प्रिंट तयार असून पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला यश मिळवून देऊ आणि त्याच जोरावर वरिष्ठांसमोर माझं काम दाखवून देऊ. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश आल्यास निवडणूक लढवून जिंकूही असा निर्धारही उद्योजक सुरेश घाटगे यांनी व्यक्त केला.