• दगडखाणीत सापडला मृतदेह 
  • संशयित पती आणि दिरास अटक

खानापूर / प्रतिनिधी 

पैशाची मागणी आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने दगड खाणीत उडी  घेऊन आत्महत्या केली. रामनगर (ता. जोयडा) येथे ही घटना घडली. मंजिरी देसाई  (वय २६, रा. कृष्ण गल्ली, रामनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशय पती आणि दिराला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, मंजिरी देसाई  ही विवाहित महिला शनिवारी सायंकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. रविवारी तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

यानंतर सोमवारी रामनगर येथील दिलीप बिडकॉन नामक कंपनीच्या बंद दगडी खाणीत साठवलेल्या पाण्यात तिचा मृतदेह सापडल्यावर दुपारी दीडच्या सुमारास गणेशगुढी येथील राफ्टधारकांना  घटनास्थळी बोलावून  मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत. पती कामानिमित्त परगावी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मंजिरीच्या आत्महत्येमध्ये सासरच्या मंडळींचा हात असल्याचा संशय  व्यक्त करून माहेरच्या मंडळींनी रामनगर पोलिसात पती आणि दीर यांच्यावर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी पती दयानंद देसाई आणि दीर गोपाळ देसाई यांना संशयित म्हणून अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. सोमवारी रामनगर येथील सरकारी रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले याचा अहवाल लवकरच मंगळूर येथून प्राप्त होणार असून अहवाल मिळाल्यानंतरच ही आत्महत्या आहे की घातपात हे स्पष्ट होणार आहे.